

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; शेतकरी विरोधी, जनविरोधी, पर्यावरण विरोधी व भ्रष्टाचार युक्त असा गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेवर लादत आहेत. बारा जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले या विरोधातील शेतकऱ्यांचा धडक गळफास मोर्चा आज (बुधवार) मुंबईतील आझाद मैदान येथून राज्य विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी विधानभवनावर जाणार आहे. तत्पूर्वी; आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी भावना व्यक्त करत महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. या निमित्य शेतकरी एकवटला आहे.
यावेळी महामार्ग शक्ती विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, माजी आमदार के पी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेती वाचवा देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा आशयाच्या टोप्या शेतकऱ्यांनी परिधान केल्या होत्या.
आतापर्यंत जे महामार्ग झाले त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला याचा सरकारने विचार करावा अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. टोल कंपन्या, सिमेंट कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी हा महामार्ग करीत आहेत. एक लाख कोटी रुपये शक्तिपीठ महामार्गासाठी कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजही एका मंत्र्याने बैठक घेतलेली नाही असा प्रश्न उपस्थित केला.
वसमत उद्धव माखणे यांनी शक्तीपीठ महामार्गाबद्दल मत व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांसाठी लढा देणारे धर्मा पाटील यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा म्हंटला. यावेळी टाळ्या वाजवून शेतकऱ्यांनी साथ दिली. या पोवाड्यातून महायुती सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. महागाई वाढली म्हणत शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न पोवाड्यातून सरकारला विचारला. यानंतर लातूर जिल्ह्यातील येथील शेतकरी गजेंद्र येळकर यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आपण येथून जायचे नाही, आपण कोणत्याच खासगी व्यक्तीला येऊ द्यायचे नाही, आपली जात एकच ती म्हणजे शेतकरी, असे मत व्यक्त केले.