

मुंबई : बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉग वापरणार्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई होणार आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिला आहे.
लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज अॅनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणार्या पनीर विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे मंत्री झिरवळ यांनी सांगितले.
अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसार विक्री होणार्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्डस्, डिस्प्ले बोर्डस् आणि ऑर्डर मशिनवर देणे अनिवार्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकार्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज अॅनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत.