

CM Devendra Fadnavis Birthday Hoardings Ban
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नयेत. वृत्तपत्रातून, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.
होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे.
खरेतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बॅनर, होर्डिंग लावले की नेता खुश होतो. किंबहुना आपल्या नेत्याच्या नजरेत आपण पडावे म्हणूनच नेते, कार्यकर्ते हा खटाटोप करतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी असे प्रकार केल्याचे आढळल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. प्रदेश भाजपतर्फे तशी ताकीद देण्यात आली आहे. यामुळे अनेकांचा हिरमोड होणार आहे.