

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर राजकीय पक्षांची नजर असल्याचे सांगत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. हे आंदोलन राजकीय होत असल्याचे आता माध्यमांना दिसत आहे. काही विरोधी राजकीय पक्ष जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांचे नुकसानच होईल. राज्यात अडीच वर्षे जे सरकार होते, त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा एक तरी निर्णय घेतला असेल तर तो दाखवावा, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ओबीसीमध्ये आधीच सुमारे 350 जाती आहेत. आपण जर मेडिकल प्रवेशाची आकडेवारी पाहिली, तर ओबीसीचा कटऑफ हा एसईबीसीपेक्षा (मराठा आरक्षण) जास्त आहे आणि एसईबीसीचा कटऑफ ईडब्ल्यूएसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या मागणीमुळे समाजाचे नेमके किती भले होईल, हे मला माहीत नाही. मराठा समाजाच्या नेत्यांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी समाजाच्या हिताचा अभ्यास करूनच मागणी करावी.
आंदोलनाच्या स्वरूपावर बोलताना फडणवीस म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि जोपर्यंत ते लोकशाही मार्गाने सुरू आहे, तोपर्यंत आमची काहीही अडचण नाही. आम्ही चर्चेतूनच प्रश्न सोडवू. मात्र, कोणतेही आंदोलन कायद्याच्या आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीबाहेर जाता कामा नये, ही आमची अपेक्षा आहे.