

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी झालेल्या वायुगळतीत मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड या औषध निर्माण कंपनीतील चार कामगारांचा मृत्यू झाला होता .या प्रकरणी पोलिसांनी कंपनीतील चार अधिकार्यांवर गुन्हा दाखल केला असून औद्योगिक व आरोग्य संचालनालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागांतर्फे चौकशी सुरू केली आहे.
प्लॉट क्र. एफ-13 वरील कारखान्यात गुरुवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास उत्पादन प्रक्रिये दरम्यान अचानक वायुगळती झाली होती. यात सहा कामगारांचा मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर रुग्णालय परिसरात मृत कामगारांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. सुरक्षाविषयक उपकरणांचा अभाव आणि जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याचा आरोप मृत कामगार कमलेश यादव यांच्या भावाने केला.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजेंद्र गावित, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी रुग्णालय व कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी सकाळी चारही मृत कामगारांचे शवविच्छेदन तारापूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. उपसंचालक एच. डी. शिंदे व सहाय्यक संचालक एस. जी. सब्बन यांनी प्राथमिक चौकशी केली असून सविस्तर चौकशी सुरू आहे. आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे औद्योगिक व आरोग्य संचालनालय, पालघरचे सहसंचालक माधव तोटेवाड यांनी सांगितले.
लीकेजची होती आधीपासून माहिती
कंपनीच्या 101 क्रमांकाच्या रिअॅक्टरमधील बॉटम वॉल लिकेज असल्याची माहिती व्यवस्थापनाला आधीपासून होती. मात्र, दुरुस्ती न करता उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. कामगारांना कोणतेही सुरक्षा प्रशिक्षण न देता, सुरक्षा अधिकारी न नेमता थेट घातक रसायनांच्या प्रक्रियेत कामास लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी अल्बेन्डाझोल उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान रिक्टरच्या व्हेंटमधून विषारी वायू गळती होऊन दुर्घटना घडली.