

मालाड (मुंबई): मालाड पश्चिमेतील मालवणी टपाल कार्यालयातील निम्म्याहून अधिक कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने टपाल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कधी पार्सल काऊंटर, तर कधी पोस्ट बँकेच्या व्यवहारांसाठीचा काऊंटर बंद राहिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
टपाल प्रशासनाने २९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत पार्सल, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर सेवा, तसेच पोस्ट स्टॅम्प व रेव्हन्यू स्टॅम्प विक्री पूर्णतः बंद ठेवली आहे. याशिवाय पोस्ट बँकेतील मासिक ठेव, बचत खात्यातील पैसे भरणे व काढणे हे व्यवहारही तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.
माझी आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी आज मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठवायचे होते. मात्र सेवा बंद असल्याने आता थेट ५ जानेवारीपर्यंत थांबावे लागणार आहे.
कृष्णा वाघमारे, नागरिक
या सेवाबंदमुळे मनी ऑर्डरद्वारे आर्थिक मदत पाठवणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे. आधार कार्डसाठी येणाऱ्या नागरिकांची कामेही रखडली असून, महत्त्वाची कागदपत्रे व शासकीय दस्तऐवज वेळेत पोहोचत नसल्याने नागरिक प्रचंड हतबल झाले आहेत.