

मुंबई : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील वाढत्या राजकीय गुन्ह्यांबाबत आयोगाने चिंता व्यक्त केली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जप्त करण्यात आलेली रक्कम अडीच पट आहे. त्यामुळे या आघाडीवर अंमलबजावणी यंत्रणांनी अधिक सतर्क राहावे, अशा सूचनाही आयोगाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आणि झारखंड राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांची ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक पार पडली. या बैठकीस निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांसह राज्यातील पोलिस यंत्रणेतील प्रमुख अधिकारी, महाराष्ट्रातील अंमलबजावणी यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राजकीय गुन्हे आणि जप्त मालमत्तेबाबत वरील सूचना केल्या.
या बैठकीत निवडणूक कामांचा आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 175 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. झारखंड येथे ही रक्कम 114 कोटीवर गेली आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण रक्कम 345 कोटींवर पोहचली आहे. ही रक्कम 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास अडीच पट जास्त असल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये केलेल्या कारवाईत 122.67 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली होती.