Vidhan Parishad seats | विधान परिषद जागा वाटप तिढा; एकनाथ शिंदे दिल्लीला

Vidhan Parishad seats |
Vidhan Parishad seats | विधान परिषद जागा वाटप तिढा; एकनाथ शिंदे दिल्लीलाPudhari
Published on
Updated on

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 17 जागांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदेंनी 17 पैकी 7 जागांवर दावा केला असून स्थानिक भाजप एवढ्या जागा द्यायला तयार नसल्याने भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असताना जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. 17 पैकी 7 जागांवर शिवसेना तर तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) दावा केला आहे. मात्र, भाजप मित्रपक्षाला एवढ्या जागा सोडण्यास तयार नाही. संख्याबळाच्या आधारावर जागावाटप व्हावे ही राज्य भाजपची भूमिका आहे.

काही जागांवर शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्ली दौरा केला होता. त्यानंतर लगेच ते पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे भाजप नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील दिल्लीला गेले आहेत. सकाळी नंदनवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती.

मविआची आज जागा वाटपासाठी बैठक

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या 17 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत खलबते सुरू झाली आहेत. महायुतीच्या जागवाटपाचे सूत्र अंतिम करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात आपापल्यापरीने मोर्चेबांधणी सुरू आहे; तर महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत होणार्‍या या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी (शप) कडून शशिकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news