

ठाणे : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दोस्तीत कुस्ती नको, कुठल्याही नेता तसेच प्रवक्त्यांनी मित्र पक्षावर टीका करू नये असे आदेश काढले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र येणार नाहीत. रवींद्र धंगेकर यांनी मांडलेली भूमिका व्यक्तिगत असू शकते, पक्षाची अशा प्रकारची कुठलीही भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांविरोधात असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे संकेतही शिंदे यांनी दिले आहेत.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत जुंपली असून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत आहेत. त्याबाबत बोलताना परांजपे म्हणाले, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही नेता तसेच प्रवक्त्यांनी मित्र पक्षावर टीका करू नये असे आदेश काढले आहेत. तशीच अपेक्षा मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहे. आजही भाजपच्या प्रवक्त्यांनी शिवसेनेवर ज्या भाषेत टीका केली आहे ती योग्य नसून प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात, असाही इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीची जेव्हा बैठक होईल, त्यावेळी नक्कीच पक्षांमधील अधिकच्या समन्वयावर चर्चा होईल.
मुंबईत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी भेटले होते. त्या भेटीमागे फार काही राजकीय निष्कर्ष काढण्याची गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात दोन्ही ठाकरे यांनी कार्टून आणि चित्रकला जोपासावी, मला राजकारण करून द्यावे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही, असे परांजपे यांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर खूनप्रकरणी विरोधकांनी पूर्णेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले. शिंदे हे पूर्णेकर यांच्या भेटीला गेले असते तर आणखी वेगळा अर्थ विरोधकांनी काढला असता, असेही ते म्हणाले.