

मुंबई : मराठी भाषेची गळचेपी सहन करणार नाही आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचे ते करू, असे ठाम मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी पक्षशिस्त, कमी बोलणे आणि जास्त काम करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला.
मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. दिलेला शब्द आपण पाळतो. त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे, असा दावाही त्यांनी केला.
आपल्या भाषणात त्यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकार्यांना काही कानमंत्र दिले. ते म्हणाले, विरोधकांना उघडे पाडण्याच्या प्रयत्नात स्वतः उघडे पडू नका. तुमचा एक चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणू शकतो. आपण मिळवलेले यश चुकीच्या बोलण्याने घालवू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. नुकतेच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी खा. नारायण राणे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने ते अडचणीत आले होते. त्यामुळे शिंदेंनी या सूचना दिल्याची चर्चा होती.
शिंदे यांनी ‘घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे निर्देश बैठकीत दिले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शाखांचे जाळे घट्ट केले आहे. शाखा हा लोकांना आधार आहे. कंटेनर शाखेचा कॉन्सेप्ट ठिकठिकाणी राबवा, असेही ते म्हणाले.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करतानाच त्यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. उमेदवार चुकला की संपलं, असे त्यांनी स्पष्ट केले.