

मुंबई ः कमी गुण असूनही अनेकांनी नामवंत महविद्यालये निवडल्याने तसेच पसंतीक्रमाच्या घोळामुळे अकरावी प्रवेशात अनेकांना चौथ्या यादीतही प्रवेश मिळालेला नाही. अजूनही राज्यातील तसेच महामुंबईतील हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असूनही केवळ 83 हजार 944 विद्यार्थांना प्रवेश मिळाला आहे. तर मुंबईतील केवळ 18 हजार 474 विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश आहे. यामुळे 5 लाख 43 हजार 516 विद्यार्थ्यांना आता पुढील फेरीची वाट पहावी लागणार आहे.
राज्यभरातून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी 14 लाख 29 हजार 234 विद्यार्थ्यांनी केलेली आहे. प्रवेशाच्या नियमित फेरी एक व दोन मध्ये 7 लाख 20 हजार 666 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर नियमित तिसर्या फेरीत 1 लाख 11 हजार 235 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यापैकी 93 हजार 061 विद्यार्थांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले. त्यानुसार तिसर्या यादी अखेर राज्यात 8 लाख 13 हजार 727 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या चौथ्या फेरीमध्ये राज्यात 83 हजार 944 विद्यार्थांना प्रवेश देण्यात आले आहेत. या यादीतही नामवंत महाविद्यालयांच्या प्रत्येक शाखेच्या कट-ऑफमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. 80 ते 70 टक्के व त्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या महाविद्यालयाच्या पसंतीक्रमाचा पुनर्विचार करावा लागणार आहे. तिसर्या यादीत एचआर महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा कट-ऑफ 98 टक्क्यांवर गेला होता. विल्सन महाविद्यालयात तिसर्या यादीत कला शाखेसाठी 71 टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता.
चौथ्या यादीत हा टक्का 71.4 वर गेला आहे. रुपारेल महाविद्यालयात कला शाखेसाठी तिसर्या यादीत 84.4 टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला. पण चौथ्या यादीचा कट-ऑफ 85.2 टक्क्यांवर गेला आहे. कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमाबाबत विचार करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले आहे, 2 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.