मुंबई : विधानसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. चला उठा, आता सज्ज व्हा, मुंबईवर सुद्धा भगव्याचे राज्य येणार, अशा शब्दांत मुंबई महापालिका जिंकण्याचा विश्वास शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षाचा 59 वा वर्धापन दिन सोहळा वरळीतील डोम येथे गुरुवारी रात्री पार पडला. या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकार्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
माणसाचे दिवस, परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही, जेव्हा सत्तेत होते तेव्हा सगळ्यांना कस्पटासमान समजणार्यांची आज काय अवस्था झाली आहे, बाळासाहेबांचा विचार सोडल्याने, सत्तेसाठी लाचारी केल्याने ही अवस्था झाली आहे. माझ्याशी युती करता का म्हणून आज ते आगतिक, उतावीळ आणि लाचार झाले आहेत, अशा शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. शिवसेना पक्षाचा 59 वा वर्धापन दिन सोहळा वरळीतील डोम येथे गुरुवारी रात्री पार पडला. या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकार्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
महायुतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढली आणि जिंकली, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आपल्याला महायुती म्हणून लढायच्या आहेत, असे शिंदे म्हणाले. राष्ट्र जिंकले, महाराष्ट्रही जिंकला आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपणच जिंकणार, असा ठाम विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आतापर्यंत उबाठाचे मुंबईतील 50 नगरसेवक आणि इतर पक्षाचे मिळून 65 माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी सभेत दिली.
मुख्यमंत्रीपदासाठी जे लाचार, अगतिक झाले ते स्वत:ला बाळासाहेबांचे वारसदार असल्याचे सांगतात. त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. राज्यातील जनतेला, मतदारांना धोका देत प्रतारणा केली. बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेससोबत यांनी सत्ता मिळवली, असा हल्ला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.
बाळासाहेबांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण त्यांनी हिंदुत्त्व सोडले नाही. परंतु, बाळासाहेबांचे वारसदार म्हणणार्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. आता निवडणुकीचे वारे दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आज जो दुसरा मेळावा सुरू आहे तो सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला आहे. सत्तेसाठी त्यांनी कंबरेचे सोडले आणि डोक्याला गुंडाळले. सत्तेसाठी यांनी हिंदुत्त्व सोडून दिले. पण आपण राजकारण, मतांसाठी कधीही हिंदुत्व सोडणार नाही, हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. आज बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार असणार्या लोकांना त्यांनी उलटे टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. तुम्ही हिंदुत्त्व सोडले नाही तर मग बाळासाहेबांना ’हिंदुहृदयस्रमाट’ म्हणताना तुमची जीभ का कचरते. हिंदू धर्माला शिव्या देणार्यांच्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला.
अमित शहांनी काश्मीरमधील 370 कलम हटवले. बाळासाहेबांचे स्वप्न शहांनी पूर्ण केले त्यांनाच शिव्या देता. त्यांना अहंकार असून तोच यांना विनाशाकडे नेत आहे, असा हल्ला शिंदेंनी चढविला.
ज्यांनी विश्वासघात केला त्यांना आता मराठी माणूस आठवेल, खोटे गळे काढतील. पण बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले. मराठी माणसांपासून हिंदुत्वापर्यंत तुम्ही फारकत घेतली. मराठी माणूस मुंबईतून वसई विरार, बदलापूर, अंबरनाथला गेला. हिंदुत्व सोडले नाही. आता निवडणुकीचे वारे दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व आणि मराठी माणूस आठवत आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली.
भारतीय लष्कराने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत सर्वांना अभिमान आहे. पंतप्रधानांबाबतही अभिमान आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींचे खुलेआम कौतुक केले असते. भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकविण्याचे काम केले. लष्कराने पाकमधील दहशतवाद्यांचे अड्डे अचूक टिपले. पण हे लोक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. यांना बहुतेक ’निशान -ए -पाकिस्तान’ मिळवायचे असेल. बाळासाहेब आज असते तर यांचे कोर्टमार्शल केले असते, अशी सडकून टीका शिंदेंनी केली.
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातील भाषणात शिवसेना शिंदे गटाला कमॉन किल मी, असे आव्हान देताना अंगावर याल तर अॅम्ब्युलन्समधून जाल असा इशारा दिला. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, तुम्ही कुणाला धमकी देत आहात. एकनाथ शिंदे हा बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिवसैनिक आहे. आम्ही कोणाला नडत नाही आणि आम्हाला जो नडेल त्याला सोडत नाही. पण तोंडात नुसता दम असून चालत नाही तर मनगटात जोर लागतो. वाघाचे कातडे पाघंरून लांडगा कधी वाघ होत नाही. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने तुम्हाला आडवे करत तुमचा मुडदा पाडला आहे. आम्ही मेलेल्या लोकांच्या नादी लागत नाही. यांनी कितीही टीका केली तरी आपण आपल्या कामातून उत्तर द्यायचे. असे शिंदे म्हणाले.
या मेळाव्यात ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी विविध देशांना भेटी देणार्या भारतीय शिष्टमंडळात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांचा समावेश होता. या दोघांच्या परदेशी शिष्टमंडळासमवेतच्या अनुभवावर या मेळाव्यात मुलाखत घेण्यात आली. शिंदे आणि देवरा यांनी आपला अनुभव शिवसैनिकांना सांगितला. एकनाथ शिंदे यांनी या दोघांचेही या दौर्याबाबत कौतुक केले.
काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची, कार्यकर्त्यांची आठवण येते, एरवी हम दो हमारे दो असते. निवडणुकीचे वारे फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतो आहे. पण मतदार या निवडणुकीतही तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला.
उद्धव ठाकरेंचा समाचार घेताना शिंदे पुढे म्हणाले की, हे आता मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला विचारायचे आहे बाळासाहेबांनंतर मराठी माणसासाठी यांनी काय केले त्याचा हिशोब द्या. तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतील मराठी माणूस बाहेर गेला आहे, हे पाप तुमचे आहे, गेले 20 वर्ष मुंबईत कुणी सत्ता गाजवली हे सर्वांना माहीत आहे.
उद्धव ठाकरे कम ऑन किल मी म्हणता, ते इंग्लीश पिक्चर बघून आले असतील, पण मरे हुए को क्या मारना, महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला. नुसता शोर करून मनगटात जोर येत नाही, वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला शेर का कलेजा लागतो, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला.
ऑपरेशन सिंदुरवर प्रश्न उपस्थित करणार्या राहुल गांधीं यांच्यावरही शिंदेंनी टीका केली. राहुल गांधींचा आपल्या लष्करावर, पंतप्रधानांवर विश्वास नाही, त्यांना पाकिस्तानवर विश्वास आहे. राहुल गांधी आणि उबाठाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय किती विमाने पडली, किती ड्रोनचे नुकसान झाले. भारतीय लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न विचारताय, देशद्रोहापेक्षा हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही भारतीय आहात की पाकिस्तानचे एजंट आहात, असा सवाल शिंदेंनी केला.
बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण बाळासाहेबांचे वारसदार म्हणणार्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. आता निवडणुकीचे वारे दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्व, मराठी माणूस आठवत आहे.
एकनाथ शिंदे