

मुंबई : मुख्यमंत्रिपदावरील दावा भाजपने अमान्य केल्यामुळे निर्माण झालेली नाराजी आणि तब्येतीच्या कारणास्तव काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले काही दिवस सक्रिय नव्हते. तथापि मंगळवारी ते पुन्हा सक्रिय झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत करण्यात आलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिंदे मंगळवारी सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणार्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी-सुविधांचा आढावा शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.