

मुंबई : वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक यांना मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी याचिका सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचा विरोध डावलून मलिक यांना अजित पवार गटाने मानखुर्द मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या मलिक यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांचा जामीन रद्द करण्याचा विनंती अर्ज ईडीने उच्च न्यायालयात दाखल केला आहे. मलिक हे मनी लाँडरिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशाचे व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावरून त्यांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर ते अनेक दिवस तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला होता.