

Eco Friendly Ganesh Murti Made from paper
घाटकोपर : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून सर्व गणेशभक्तांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्याकरिता सर्वत्र तयारीची धूमधाम चालू आहे. अशातच विक्रोळीतील विकेश इंग्लिश हायस्कूलमधील शिक्षक दिपक गभाले हे एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक कलात्मक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यासाठी त्यांनी केवळ 200 रुपयांत घरच्या घरीच फक्त रद्दी पेपर वापरून सुमारे अडीच ते तीन फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती साकारली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून ते अशाप्रकारे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वतः तयार करत आहेत. यासाठी ते वर्षभर घरातील वाचून झालेले वर्तमानपत्र जमा करून ठेवतात.साधारणतः दोन ते तीन आठवड्यांच्या प्रक्रियेनंतर ही मूर्ती तयार होते. अशा या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीनेच केले जाते. घरातच एका टबमध्ये या मूर्तीचे विसर्जन
करून ते पाणी झाडांना घातले जाते. यातून कला, श्रम, भक्ती आणि पर्यावरणाबद्दलची आस्था पाहायला मिळते. 2020मध्ये कोरोना महामारीमुळे सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध आल्याने त्यांनी पहिल्यांदाच याप्रकारे रद्दीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली. तेव्हापासून गेली पाच वर्षे ते सतत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत. हा उपक्रम केवळ एक कलाकृती नसून त्यापासून पर्यावरण संरक्षणाचा आणि पर्यावरण पूरक उत्सवाचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे दिपक गबाले यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.