मुंबई : न्यायालयाने पीओपीच्या गणेशमूर्तींवरील बंदी हटवल्याने मूर्तिकार सुखावले आहेत, मात्र आराध्य देवतेची विर्सजनानंतर होणारी विटंबना थांबविण्यासाठी लाखो भाविकांना पर्यावरण पूरक गणेशमूर्तींचा पर्याय हवा आहे. भक्तांच्या धार्मिक आणि मानसिक भावनेबरोबरच आर्थिक गणित लक्षात घेवून अनेक मूर्तीकार पर्यावरण आणि व्यवसाय याचा समतोल साधून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेनं वजनाला हलक्या आणि पीओपी इतक्याच सुबक गणेश मूर्ती साकारून मूर्तीकार गणेशभक्तांना पर्यावरणपूरक मूर्तींचा पर्याय उपलब्ध करून देत आहे. शाडूच्या मातीबरोबरच कागद्याच्या लगद्यात पर्यावरण पूरक घटकांचा समावेश करून मूर्तींची सुबकता घडविण्याची लगबग ठाणे आणि मुंबईतील गणपती कारखान्यात सुरू आहे.
विसर्जनानंतर पीओपी द्वारे होणारे जलप्रदूषण या महत्वाच्या पर्यावरणीय मुद्द्याबरोबरच पीओपीचे पाण्यात विघटन होत नसल्याने गणेशमूर्तींची होणारी विटंबना थांबविण्यासाठी पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. मात्र सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांच्या या लढ्याला न्यायालयात यश मिळाले नाही, परंतू घरगुती गणेशभक्तांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती होत असल्याने अनेक भक्त मूर्तीकारांकडे पीओपी ऐवजी पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी आणि नोंदणी करत आहेत.
लाल माती आणि शेणाचा वापर - माझ्या कारखान्यात शाडूच्या मातीच्या मूर्तीतर मी घडवतोच. पण ग्राहकांना वजनाला हलक्या असणार्या आणि विसर्जनानंतर पूर्णपणे विरघळणार्या मूर्ती हव्या असतात. मूर्ती घडवितांना कागदाच्या पुठठ्यांचा वापर करून पर्यावरणपूरक मूर्ती करतो, पण त्याचबरोबर लाल माती, गाईचे शेण मिसऴून त्यापासून मूर्ती करतो. या मूर्तींवर वॉटर कलरनेच रंगकाम करतो. या लगद्यात मूर्तीला हानी पोहचू नये, यासाठी आम्ही डिंक वापरतो. डिंकामुळे मूर्तीच्या आतील मिश्रण एकजीव, टिकाऊ होतेच, पण त्यात ओलसरपणाही कमी होते, त्यामुळे ग्राहकांचा मूर्तीवर हार घातल्यानंतर मूर्तीची होणारी झीजचा प्रश्नही आता सुटला आहे, शासनाने अशा प्रकारच्या मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले तर मूर्तींची विल्हेवाट लावण्याचा आणि नंतर रिसायकलिंगवर होणार्या खर्चही मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येईल
मंगेश पंडित, मूर्तीकार-कळवा-ठाणे
वह्यांच्या रद्दीची पाने, डिंक आणि लांबीचा वापर - विद्यार्थ्यांच्या वह्यांची रद्दी, काही कार्यालयांमधून रद्दी तसेच प्रिटिंग प्रेस मध्ये बाईडिंग करतांना कटाई होतांना जमा होणारा कागदांचे वेस्टेज आम्ही गोळा करतो. यात खायचा डिंक वितळून टाकतो, त्यात लांबी पावडर स्वरूपात मिसळून त्या लगद्यापासून आम्ही गणेश मूर्ती साकरतो. या मूर्तीचे वैशिष्ट ती शाडू आणि पीओपीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने खूपच हलकी असतो, ही मूर्ती सुकल्यावर कागदात डिंक आणि लांबी असल्याने त्याचा ओलसरपणा नसतो. रंगासाठीही आम्ही पर्यावरणपूरक रंगच वापरतो. पीओपीच्या तुलनेत या मूर्तींची किंमत नक्कीच कमी आहे, अनेक जणांच्या घरी विसर्जनाच्या वेळी मदतीला कुणी असतेच असे नाही, त्यामुळे वजनाने हलक्या आणि किफायतशीर किंमत आणि सुबकतेमुळे माझ्याकडे असलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे.
पराग रामचंद्र पारधी, मूर्तीकार, लोअर परेल