

मुंबई : उमेदवारी जाहीर न करता राजकीय पक्षांनी पसंतीच्या उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. त्यानुसार आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारीच्या चित्रावरून राजकीय घराणेशाहीच्या नावाने बोटे मोडणाऱ्या प्रमुख पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीच जोपासल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजपसह शिंदे सेना, ठाकरे सेना, काँग्रेस, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांमधील नेते, आमदार, खासदारांचे नातेवाईक, भाऊ, पत्नी, मुले, सुना यांना उमेदवारी दिल्याचे उघड झाले आहे.
काँग्रेस वगळता भाजप, शिंदे सेना, शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांनी मुंबईतील अधिकृत उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाने अनेक ठिकाणी नेत्यांच्या आग्रहावरून त्यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू (प्रभाग क्र.५४), वर्सोवाचे आमदार हारुण खान यांची कन्या सबा खान (प्रभाग क्र.६४), माजी खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव गीतेश राऊत (प्रभाग ८९), माजी आमदार दिवंगत श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री (प्रभाग ९५), माजी आमदार प्रकाश फातर्फेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्फेकर (प्रभाग १५०), आमदार मनोज जामसुतकर यांची पत्नी सोनम जामसूतकर (प्रभाग २१०), माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक (प्रभाग २२५), माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरव घोसाळकर यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षांचे भाऊ-भावजय यांना तिकीट
भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भावाला आणि भावजयीला उमेदवारी दिली आहे. त्यानुसार मकरंद नार्वेकर हे प्रभाग २२६ मधून तर हर्षिता नार्वेकर यांना प्रभाग २२७मधून तिकीट देण्यात आले आहे.
मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांना प्रभाग २२१ मधून, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील यांना प्रभाग १०७ मधून, तर माजी आमदार सुरेश गंभीर यांची कन्या शीतल गंभीर-देसाई यांना प्रभाग १९० मधून उमेदवारी मिळाली आहे.
शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर-गुरव हिला प्रभाग १९१ मधून आणि मुलगा समाधान सरवणकर यांना प्रभाग १९४ येथून उमेदवारी दिली आहे.
नवाब मलिक यांच्या घरात तिघांना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी मंत्री नवाब मलिक यांच्या घरात तीनजणांना तिकीट दिले आहे. त्यात मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा खान आणि सून बुशरा मलिक यांचा समावेश आहे. काँग्रेसने माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख यांचे चिरंजीव हैदर शेख यांना प्रभाग ३४ मधून, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांची कन्या प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग १४० मधून उमेदवारी दिली आहे.