मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर धुळीचे साम्राज्य, प्रवासी त्रस्‍त

वाहचालकांसहित प्रवासी वर्ग, रहिवाशी नागरिक त्रस्त
Dust reigns on Mumbai-Goa National Highway 66, commuters suffer
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर धुळीचे साम्राज्य, प्रवासी त्रस्‍त File Photo
Published on
Updated on

कोलाड : विश्वास निकम

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु या चौपदरीकरणासाठी वापरण्यात येणारी माती, सिमेंट, खडी रस्त्यावर पडत असल्यामुळे या महामार्गांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खांब, पुई, कोलाड बाजारपेठेत ते तळवली रातवड या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे येथे प्रचंड धूळ पसरत आहे. या धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवासी वर्ग व रहिवाशी नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गांवर धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे. परंतु या फवारणीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. या चिखलातून मार्ग काढतांना दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. यामुळे असंख्य प्रवाशी जखमी होत आहेत, तर अनेकांचा नाहक बळी जात आहे. यामुळे याला जबादार कोण? असा प्रश्न प्रवासी वर्गातून केला जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १७ वर्षांपासून सुरु आहे. परंतु विधानसभा निवडणुकी नंतर हे काम युद्ध पातळीवर सुरु असले तरी या कामात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, खांब, पुगांव, पुई, कोलाड बाजारपेठ, वरसगांव, तळवली ते रातवड या ठिकाणी रस्ता काँक्रिटिकरण, उड्डाणपूल, छोटे मोठे ब्रिज, गटार, बायपास रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु शासनाचे काम बारा महिने थांब या म्हणीप्रमाणे सुरु आहे. यामुळे या महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही.

कोलाड बाजारपेठेत तसेच तळवली, पुई, खांब येथील महामार्गवरील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे वाहचालकांसहित, प्रवाशी वर्ग, व्यापारी तसेच रहिवाशी नागरिक बेजार झाले आहेत. वेगाने येजा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे. याला पर्याय म्हणून रस्त्यावर पाणी मारले जात आहे. परंतु या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे, तर दोन तासांनी परिस्थिती जैसे थे अशीच होते. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निस्कृष्ठ दर्जाचे असल्यामुळे या महामार्गांवर दररोज अपघात होत आहेत. यामुळे असंख्य नागरिकांचा नाहक बळी जात आहे. शिवाय रस्त्यावर पसरत असलेल्या धुळीमुळे समोरील रस्ता दिसेनासा होतो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शिवाय या धुळीमुळे सर्दी, दमा, खोकला, घशाचे आजार डोळ्यांच्या आजरांनी डोके वर काढले आहे. यामुळे लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी महामार्गाचे काम लवकरच लवकर पूर्ण करावे अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news