

मुंबई : सर्वांना प्रतीक्षा असणारा मान्सून महाराष्ट्रात एक दिवस आधीच दाखल झाला असला तरी त्याची कृपादृष्टी सर्वदूर महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कमीच आहे. राज्यातील १८१ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना केले.
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमीच राहणार आहे. हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजानुसार या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. दोन दिवस मान्सून तळकोकणातच रेंगाळला आहे. त्यामुळे कोकणात दाखल झालेला पाऊस सर्वदूर सक्रिय होणार नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
महाराष्ट्रात ३५३ पैकी तब्बल १८१ तालुक्यांवर यंदा भीषण दुष्काळाचे सावट असल्याचा अंदाज आयआयटी मुंबईच्या भारत फोरकास्ट सिस्टीमने वर्तवला आहे. प्रामुख्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील तालुके यामुळे प्रभावित होऊ शकतात. तसेच यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
देशातील इतर भागातसुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सूनपूर्व सरी आणि काही ठिकाणी झालेल्या मान्सूनचा पाऊस यामुळे आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन यापूर्वीही कृषी विभागाने केले होते. हवामान कोरडे होणार असल्यामुळे पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
पुणे : मान्सूनचा वेग किंचित मंदावल्याने गत २४ तासांपासून तो तळकोकणात तळ ठोकून आहे. सोमवारी पुणे, तर मंगळवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने रविवारी प. बंगालसह ईशान्य भारतात प्रवेश केला आहे. सध्या मान्सून तळकोकणात आहे. सोमवारी ८ रोजी पुणे, तर मंगळवारी ९ जून रोजी मुंबईत जाईल, असा अंदाज आहे. संपूर्ण राज्यात जाण्यासाठी जूनचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. त्यामुळे मान्सूनचा मोठा पाऊस हा १५ जूननंतरच राज्यात दिसेल, असाही अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.