कल्याण, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयी हॅटट्रिक मारली आहे. या मतदारसंघात एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढाई बघायला मिळाली.
टपाल मतदान मिळून एकूण ३१ फेऱ्या झालेल्या मतमोजणीत मध्ये एकूण वैद्य मते १० लाख ३४ हजार ५० या मध्ये नोटाला ११ हजार ६८६ मते मिळाली आहेत. श्रीकांत शिंदे २ लाख ९ हजार १४५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकुण ५ लाख ८९ हजार ६३६ मते प्राप्त झाली आहेत. यासोबतच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना ३ लाख ८० हजार ४९२ मते मिळाली आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठपासून सुरुवात झाली होती. शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उध्दव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्याशी लढतीत पहिल्या फेरी पासुनच दहा हजारांहून अधिक मताची आघाडी मिळावली होती. या सोबतच विजयी घोडदौड सुरू ठेवली. सोळाव्या फेरीमध्ये डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दोन लाखांची आघाडी घेत आपला विजयावर शिक्कामोर्तब केल्याने महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला.
डॉ.श्रीकांत शिंदे २०१४ साली पाहिल्यांदा कल्याण लोकसभेच्या रिंगणात तत्कालीन शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उभे राहिले होते. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि मनसेचे राजू पाटील यांचे आव्हान होते. दरम्यान या लढतीत डॉ. श्रीकांत शिंदे यांना ४ लाख ४० हजार ८९२ मते मिळाली. एनसीपीचे आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार १३४ तर मनसेचे राजू पाटील यांना १ लाख २२ हजार ३४९ मते मिळाली होती. यामध्ये शिंदे तब्बल २ लाख ५० हजार ७५८ मतांनी विजयी झाले होते. त्यानतंर दुसऱ्यांदा २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदार संघातून डॉ.श्रीकांत शिंदे यांना ५ लाख ५९ हजार ७३३ मते मिळाली होती. एनसीपीचे बाबाजी पाटील यांना २ लाख १५ हजार ३८० मते मिळाली होती. दरम्यान डॉ. शिंदे हे ३ लाख ४९ हजार ३४३ विजयी झाले होते.
शिवसेना पक्षातून बाहेर पडून सत्तांतर झाल्याने शिवसेना पक्षाचे दोन गट पडल्याने शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट असे दोन पक्ष झाल्याने डॉ.श्रीकांत शिंदे शिवसेना (शिंदे गट) महायुती कडून तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदार संघातून खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. तर शिवसेना ठाकरे गट महाआघाडीच्या वतीने वैशाली दरेकर यांना निवडणूक रिंगणात उतवण्यात आले होते.
हेही वाचा :