

मुंबई : डॉ. संपदा मुंडे जीवन संपविणे प्रकरणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (मार्ड) तीन नोव्हेंबर (सोमवार) पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मुंडे यांच्या मृत्यूमुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून पुढील सूचनेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बंद राहतील, असे मार्डमधील सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे या नुकत्याच मृत अवस्थेत आढळल्या. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचे आणि घरमालकाच्या मुलाचे नाव असून त्यांच्या त्रासाला तेच जबाबदार असल्याचे कथितरीत्या म्हटले आहे. मार्डच्या एका शिष्टमंडळाने डॉ. मुंडे यांच्या मूळ गावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि न्यायाच्या मागणीसाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. डॉ. मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आम्ह आमचे आंदोलन सुरू ठेवू, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
सरकारच्या उदासीनतेमुळे पर्याय उरलेला नाही कोणत्याही त्रासाला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असे मार्डने एका निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हाला खेद आहे, पण आमचा लढा न्यायासाठी आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे आमच्यासमोर दूसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.