

Dr. Pratapsinh Jadhav Lokmanya Tilak Journalism Award
मुंबई : 'दै. पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने सन २०१९ ते २०२३ या पाच वर्षांतील जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२३ या वर्षाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी राज्य सरकारने 'दै. पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची निवड केली आहे. पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ 'दै. पुढारी' च्या माध्यमातून उत्कृष्ट पत्रकारिता केली आहे. या पन्नास वर्षांच्या काळात त्यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीत आपली आणि 'दै. पुढारीची वेगळी छाप निर्माण केली आहे. प्रचंड खपाचे एकमेव निःपक्ष व निर्भीड दैनिक अशी 'दै. पुढारीची ओळख निर्माण करतानाच वाचकांचे प्रबोधन करण्याची भूमिका पार पाडली आहे.
पत्रकारिता करतानाच ते विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यातही अग्रणी राहिले आहेत. राज्यभर 'दै. पुढारी'चा विस्तार करतानाच पुढारी चॅनलच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे बहुमूल्य योगदान पाहता राज्य सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.