

मुंबई : शेअर बाजारातून विदेशी संस्थांनी गुंतवणूक काढून घेतल्याने शुक्रवारी डॉलरचा भाव 91.94 वर आला. जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूक संस्थांनी तब्बल 36 हजार 500 कोटी रुपये शेअर बाजारातून काढले आहेत. त्यातच आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयावरील दबाव आणखी वाढून एका डॉलरचा भाव 91.94 रुपयांवर गेला आहे. शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसून आला आणि सेन्सेक्स 769 अंकांनी, तर निफ्टी 241 अंकांनी घसरला.
गेल्या सप्ताहात डॉलरच्या तुलनेत रुपया 1.18 टक्क्याने घसरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत एका सप्ताहात रुपयाची झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. तसेच, जानेवारी महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 2.3 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे.
गत सप्ताहातील पहिल्या तीन सत्रांतील घसरणीनंतर गुरुवारी शेअर बाजार अर्ध्या टक्क्याने वधारला. मात्र, नफा कमावण्यासाठी झालेली शेअर विक्री, विदेशी संस्थांनी काढून घेतलेली गुंतवणूक, यामुळे शुक्रवारच्या सत्रात दोन्ही शेअर निर्देशांक घसरले. सेन्सेक्स 769 आणि निफ्टी निर्देशांक 241 अंकांनी खाली आला. सेन्सेक्सच्या घसरणीमुळे बीएसईतील गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. तसेच, विदेशी संस्थांच्या शेअर विक्रीने डॉलरची मागणी वाढल्याने रुपया शुक्रवारी 92 रुपयांच्या घरात गेला आहे. बीएसई स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकात अनुक्रमे 1.6 आणि 2.2 टक्क्यांनी घसरण झाली.
अदानी पोर्टस्, इटर्नल, इंडिगो आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर भावात मोठी घसरण झाल्याने सेन्सेक्सचे सर्वाधिक नुकसान झाले. टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचयूएल, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकेतील गुंतवणुकीत वाढ झाल्याने सेन्सेक्सच्या घसरणीला लगाम बसला. निफ्टी रिअल्टी निर्देशांक 3.34 टक्क्यांनी गडगडला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात 2.27 टक्क्यांनी घसरण झाली. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे 1.8 आणि 1.95 टक्क्याने खाली आले.
रुपयाने फक्त वीस दिवसांत ओलांडली 91 ची पातळी
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच रुपया दबावाखाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये रुपया प्रथमच 90 च्या पातळीच्या पुढे गेला होता. आता अवघ्या 20 दिवसांत त्याने 91 ची पातळीही ओलांडली आहे. बाजार तज्ज्ञांचे मत आहे की, जागतिक तणाव आणि जगभरातील शेअर बाजारांमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोने आणि डॉलरमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत.