

मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, विधानभवनासमोर आज (दि.१४) एका डॉक्टरने आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भांडूपमध्ये दोन मोठी रुग्णालये उभारण्याच्या मागणीसाठी डॉ. योगेश भालेराव यांनी हे आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.
डॉ. भालेराव हे भांडूप परिसरात ५०० खाटांचे 'सावित्रीबाई फुले रुग्णालय' आणि ६०० खाटांचे अत्याधुनिक 'एनआयसीयू (NICU) रुग्णालय' उभारण्याची मागणी करत होते. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
विधिमंडळ परिसराला कडक पोलीस बंदोबस्ताचे कवच असते. अधिवेशन काळात ही सुरक्षा अधिकच वाढवली जाते. अशा परिस्थितीत डॉ. भालेराव आंदोलनासाठी पोहोचताच, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ओळखले आणि आंदोलन सुरू करण्याआधीच ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले. यामुळे त्यांचा आंदोलनाचा प्रयत्न फसला.