

नवी मुंबई : दिवाळीचा सण पंधरा दिवसावर आलेला असतानाच बाजारामध्ये डाळी आणि कडधान्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे यंदा फराळाचे बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घाऊक बाजारातील दरवाढीचे पडसाद किरकोळ बाजारातही उमटत असून, डाळी-कडधान्ये किलोमागे २० ते ३० रुपयांनी महागल्याने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
दिवाळी म्हटले की, घराघरांत चकली, चिवडा, शेव, लाडू आणि करंजीच्या तयारीची लगबग सुरु होते; यंदा फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे या लगबगीवर चिंतेचे सावट पसरले आहे. यंदा कमी पावसामुळे डाळी आणि कडधान्यांच्या उत्पादनात घट झाली असून, त्यातच दिवाळीमुळे वाढलेल्या मागणीमुळे बाजारभाव चढले आहेत.
चणाडाळीचे दर ९० ते १०० रुपये, काबुली चण्याचे दर १५० ते १६० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले आहेत. डाळी व कडधान्य महागल्यने फराळाच्या तयारीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. डाळी-कडधान्यांच्या या दरवाढीचा परिणाम केवळ दैनंदिन स्वयंपाकापुरता मर्यादित नसून, दिवाळीच्या फराळावरही होणार आहे.
घरगुती फराळाची परंपरा जपायची, नातेवाइकांना फराळाचे पदार्थ द्यायचे आणि सणाचा गोडवा टिकवायचा, तर त्यासाठी यंदा अधिक खर्च करण्याची वेळ ग्राहकांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी डाळी-कडधान्यांचे दर कमी होणार का, की महागाईचा हा तडका फराळाच्या ताटापर्यंत पोहोचणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
दिवाळीच्या आनंदासाठी खर्चाची तरतूद
चकली, शेव आणि बेसनाच्या लाडवांसाठी लागणारे बेसन व डाळी महागल्याने घरगुती फराळ तयार करणे अधिक खर्चिक ठरणार आहे. फराळाचे प्रमाण कमी ठेवावे लागेल अथवा फराळ बनवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे मासिक खर्चाचे गणित सांभाळताना सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. त्यात सणासुदीच्या काळात फराळाच्या साहित्याचे दर वाढल्याने दिवाळीचा आनंद साजरा करतानाही खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे.