

मुंबई ः पुढारी डेस्क
दिवाळीनिमित्त यंदा सहा दिवस सलग सुट्टी राहणार आहे. सुट्ट्यांच्या या दिवाळीने सहा दिवस कामकाज खोळंबण्याची शक्यता आहे. शासकीय कर्मचारी मात्र सलग सुट्ट्यांमुळे खूश आहेत.
शुक्रवारी वसुबारने दिवाळीस सुरुवात होत आहे. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी, सोमवारी नरकचतुर्दशीनिमित्त अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी बँका मात्र सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. मंगळवार लक्ष्मीपूजन तसेच बुधवार पाडव्यादिवशी राज्य शासनाची सुट्टी आहे.
लाडक्या बहिणींमुळे राज्य शासनाने यंदा भाऊबीजेला सुट्टी जाहीर केली आहे. परिणामी, शनिवारपासून गुरुवारपर्यंत सलग सहा दिवस शासकीय सुट्टी असेल. शुक्रवार, 24 ऑक्टोबरला कार्यालये उघडणार असली तरी अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारची रजा टाकून पुढचे शनिवार आणि रविवार देखील बुक केले आहेत. त्यामुळे थेट सोमवार, 27 ऑक्टोबरपासूनच खऱ्या अर्थाने कामकाज सुरळीत होईल.