

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकाजवळील लेव्हल क्रॉसिंग फाटक बुधवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास तब्बल २५ मिनिटे उघडे राहिले. रस्त्यावरील वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे हे फाटक वेळेत बंद करता आले नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. परिणामी, मध्य रेल्वेची वाहतूक कमालीची विस्कळीत झाली असून या गोंधळात ९ लोकल आणि ५ मेल-एक्स्प्रेस गाड्या जागच्या जागी खोळंबल्या होत्या. लोकल उशिराने धावत असल्याने भाऊबीजेचा मुहूर्त साधण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे दिवा रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल आला आहे.
दिवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा दिवा रेल्वे फाटक हा एकमेव मार्ग असल्याने हे फाटक दिवसातून सरासरी ३९ वेळा बंद केले जाते. फाटक उघडताच येथे शेकडो वाहनांची प्रचंड गर्दी होते. गर्दीत वाहने अडकून पडल्यास फाटक जास्त वेळ उघडे ठेवावे लागते. त्याचा परिणामी मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या तसेच जलद लोकल सेवांवर होतो आणि रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडते.
बुधवारी दुपारनंतर भाऊबीजेचा मुहूर्त होता, त्यामुळे मोठ्या संख्येने वाहने दिवा रेल्वे फाटकाजवळ क्रॉसिंगसाठी उभी होती. येथील वाहनांची गर्दी वाढल्याने अनेक वाहने थेट रेल्वे रुळांवर (क्रॉसिंग लाईनवर) अडकून पडली. परिणामी, ही वाहने पुढे जाऊन रस्ता मोकळा होईपर्यंत रेल्वे फाटक उघडे ठेवावे लागले, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
उड्डाणपूल १३ वर्षापासून रखडला
दिवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रस्ते वाहतुकीसाठी प्रवाशांना तब्बल १० रेल्वे मार्गिका (ट्रॅक) ओलांडाव्या लागतात. या वाहतूक कोंडीवर आणि समस्येवर तोडगा म्हणून २०१३ मध्ये दिवा उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील अंतर्गत विसंवादामुळे या पुलाचे काम रखडले. या प्रशासकीय दिरंगाईचा फटका रस्ते वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आणि रेल्वे प्रवाशांना रोज सहन करावा लागत असून त्यांचा प्रवास विलंबाने होत आहे. मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम पूर्ण केले असले, तरी ठाणे महापालिकेच्या हद्दीतील भूसंपादन व इतर पायाभूत कामांचा प्रश्न अद्याप न सुटल्याने हा उड्डाणपूल १३ वर्षांनंतरही अपूर्णच आहे.