मुंबई : गंभीर रुग्णांसाठी आता जिल्ह्यातच आयसीयू आणि तातडीच्या उपचारांची सुविधा मिळणार आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ उभारण्यात येत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना जिल्ह्यातच तातडीचे उपचार देणे शक्य होणार आहे.
सध्या अनेकांना आयसीयू बेड, डायलिसिस किंवा इतर तातडीच्या उपचारासाठी दुसर्या जिल्ह्यांत जावे लागते. मात्र, हे ब्लॉक्स तयार झाल्यानंतर गंभीर आजारांवर स्थानिक पातळीवरच उपचार शक्य होतील.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 5 ते 20 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये 50 बेड्सचे, तर 20 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये 100 बेड्सचे ब्लॉक्स तयार होतील.
या ब्लॉक्समध्ये आयसीयू, एचडीयू, आयसोलेशन वॉर्ड, डायलिसिस, ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, माता-बालक कक्ष आणि तातडीच्या सेवा यांचा समावेश असेल. प्रत्येक बेडसाठी 85 चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली आहे.
सध्या नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, नांदेड, बीड, अकोला, जालना आणि लातूरमध्ये काम सुरू आहे. सिंधुदुर्ग, पनवेल (ठाणे), गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये निविदा प्रक्रिया किंवा कामाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या ब्लॉक्समध्ये अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफही तैनात केले जाणार आहेत. त्यामुळे उपचारांचा दर्जा आणि वेळेवर सेवा मिळण्याचे प्रमाण वाढणार असून राज्याच्या ग्रामीण भागात देखील दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हा सरकारचा उद्देश आहे.
आरोग्य पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वर्षअखेरीपर्यंत हे सर्व क्रिटिकल केअर ब्लॉक्स कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन आंबेडकर यांनी सांगितले.