

पुढारी ऑनलाईन डेस्क : 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना जामीन मिळाला आहे. त्याच आधारे वाझे यांनी जामीन देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात जामीन मिळाला तरी अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात जामीन मिळाला नसल्याने त्यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.
2020 मध्ये सचिन वाझे यांना मनसूख हिरेन हत्याकांड व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महानगरातील रेस्टॉरंट व बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातही सचिन वाझे यांचे नाव आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
वाझे यांनी अॅड. रौनक नाईक यांच्यामार्फत रिट याचिका केली होती. त्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या द्विसदसीय खंडपीठाने मंगळवारी (दि. 22) निर्णय दिला. विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच सचिन वाझे यांना जामीन दिला होता. पण इतर दोन गुन्ह्यांतही ते आरोपी असल्याने गेल्यावर्षीपासून त्यांचा तुरुंगवास लांबला. जामीनासाठी त्यांनी मे महिन्यांत पुन्हा अर्जही केला होता. पण तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.