

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निघृण हत्या (Disha Salian death case) केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाचे पडसाद आज गुरुवारी विधानसभा अधिवेशनादरम्यान उमटले.
यावरुन विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी, विरोधक आमने-सामने आले. सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन मुद्द्यावरून घोषणाबाजी करण्यात आली. ''दबाव आणला कशाला, न्याय हवा दिशाला'' असे लिहिलेले फलक हातात घेऊन सताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.
यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, दिशा सालियन प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. न्यायालय यावर योग्य तो निर्णय देईल. शिळ्या कडीला सारखा ऊत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. न्यायालय या याचिकेवर काय निर्णय घेणार? हे पाहण महत्वाचे ठरणार आहे. भाजप ठरवून बोलत आहे, असे मला वाटते.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर मंत्री उदय सामंत म्हणाले, "या मुद्यावर राजकीय भाष्य करणे आणि राजकारण करणे योग्य नाही."