दिलीप सपाटे
मुंबई : सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तानाजी सावंत हे राज्य मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री असतानाही त्यांनी जाहीररीत्या हे वक्तव्य केल्याने महायुतीतील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी प्रकट केली आहे. मात्र, तानाजी सावंत आणि शिंदे गटात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एवढी मळमळ का आहे?, याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे सरकार सत्तेवर आहे. याआधी भाजप - शिवसेना युतीचे सरकार पूर्ण बहुमतात असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय भाजपा श्रेष्ठींनी घेतला आणि सत्तेत तिसरा वाटेकरी सामील झाला. तेव्हापासूनच शिंदे गटात राष्ट्रवादी काँग्रेसविषयी नाराजी आहे. ती अधून मधून बाहेर पडत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश झाल्याने सत्तेत आणखी एक वाटेकरी आला. मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट अशा अनेकांच्या आशा संपुष्टात आल्या. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे गोगावले यांचे स्वप्नही अपूर्ण राहिले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याशी त्यांचे खटके उडाले होते. लोकसभेच्या जागा वाटपातही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिंदे गटाचा संघर्ष झाला. नाशिक आणि धाराशिवच्या तिकिटासाठी रस्सीखेच रंगली. धाराशिव लोकसभेसाठी तानाजी सावंत हे आपले पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. पण, ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली. त्यामुळे सावंत यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे सावंत यांची अजित पवार यांच्या विषयीची मळमळ तेव्हापासून जास्तच वाढली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर गेली तर बरेच आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी बाहेर पडली तर आपल्या पक्षाला विधानसभेला जास्तीच्या जागा मिळतील, अशी अटकळ ते बांधत आहेत. त्यामुळे तानाजी सावंत यांनी आपली मळमळ जाणीवपूर्वक व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सत्तेतील वाटा कमी झाल्यानंतर आता विधानसभेच्या जागा वाटपातही राष्ट्रवादी शिंदे गटाला अडसर वाटू लागला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये ज्या जागा मिळणार होत्या त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसही वाटेकरी झाली आहे. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका शिंदे गटाला बसणार आहे. भाजपा आपल्या जिंकलेल्या 105 जागा सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. तसेच 288 पैकी किमान 150 जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. उर्वरित 138 जागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला भागवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे काही केल्या शिवसेनेला 80 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. 80 जागा लढून किती जागा जिंकणार, हा पेच शिवसेनेसमोर आहे.