Engineering pharmacy degree admission : फर्स्ट इयर नकोच, डायरेक्ट सेकंड इयर!

अभियांत्रिकी-फार्मसीच्या पदवी प्रवेशाचा ‘शॉर्टकट’ मार्ग विद्यार्थ्यांना अधिक प्रिय
Engineering pharmacy degree admission
फर्स्ट इयर नकोच, डायरेक्ट सेकंड इयर!pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : पवन होन्याळकर

अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवीसाठी थेट दुसर्‍या वर्षात प्रवेश हा विद्यार्थ्यांचा ‘शॉर्टकट मार्ग’ ठरत असून, गेल्या तीन वर्षांत या मार्गाने प्रवेश घेणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अकरावी-बारावीची दोन वर्षे आणि सीईटी परीक्षेचा ताण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी दहावीनंतर पॉलिटेक्निक पदविका पूर्ण करून अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षाला थेट प्रवेश घेत आहेत. तर दुसरीकडे बी.फार्मसीच्या दुसर्‍या वर्षी प्रवेशासाठी बारावी (सायन्स) अपरिहार्य असली तरीही स्थिर करिअर आणि नोकरीच्या खात्रीशीर संधीसाठी हा ओढा अधिक प्रिय वाटत आहे.

अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशामध्ये गेल्या दोन वर्षांत मोठी भर पडली आहे. यंदा प्रवेश पूर्ण झाले नसले तरी जागा कमी आणि अर्ज जास्त आले आहेत. 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये 43 हजार 429 विद्यार्थी या प्रक्रियेतून दुसर्‍या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला जोडले गेले होते. त्यात 34 हजार 716 अभियांत्रिकी आणि 8 हजार 713 फार्मसीला थेट प्रवेश झाले. यानंतर 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये ही संख्या झपाट्याने वाढून तब्बल 54 हजार 710 वर पोहोचली.

अभियांत्रिकीतील प्रवेश 41 हजार 894 इतके झाले, तर फार्मसीमध्ये 12 हजार 816 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. म्हणजेच एका वर्षात राज्यभरातून अभियांत्रिकीमध्ये सुमारे सात हजारांनी आणि फार्मसीमध्ये जवळपास पाच हजारांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, फार्मसीतील वाढ जवळपास 47 टक्क्यांपर्यंत, तर अभियांत्रिकीतील वाढ 21 टक्क्यांच्या आसपास आहे. एकूण चित्र पाहता, थेट द्वितीय वर्ष हा आता अधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी पसंतीचा मार्ग ठरत असल्याचे सीईटी सेलकडे असलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी जागा कमी आणि अर्ज मोठ्या संख्येने आले आहेत. पहिल्या फेरीत उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गतवर्षी जागांत वाढ झाली असली, तरी त्या तुलनेत पहिल्या वर्षी प्रवेश अधिक झाले. त्या तुलनेत यंदा 52 हजार 14 जागा उपलब्ध झाल्या. या जागांसाठी तब्बल 58 हजार 220 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 36 हजार 436 मुलांचे, तर 21 हजार 784 मुलींचे अर्ज आहेत.

प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीतच 11 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. फार्मसीलाही यंदा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून 14 हजार 10 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत अभियांत्रिकीसह फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशात पहिल्या वर्षीच्या प्रवेशारखी चुरस अधिक ठळक झाली आहे. यामध्ये दहावीनंतर पॉलिटेक्निक करणारे विद्यार्थी अधिक आहेत.

विद्यार्थी असे का करतात?

शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की, डिप्लोमा किंवा डी.फार्मा पूर्ण केल्यानंतर थेट पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणे हा अनेक विद्यार्थ्यांना वेळ वाचवणारा आणि सोपा वाटणारा ‘शॉर्टकट’ ठरत आहे. नोकरीच्या संधींमध्ये पदवीधरांना असलेले प्राधान्य आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक पात्रता यामुळे हा कल आणखी वेगाने वाढत असल्याचे ते सांगतात. पॉलिटेक्निक पदविका पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षाला थेट प्रवेश घेणार्‍यांची संख्या मागील काही वर्षांत कमी होती, मात्र गेल्या दोन वर्षांत पुन्हा वाढली आहे.

अकरावी-बारावीची दोन वर्षे आणि बारावी परीक्षेसह एमएचटी-सीईटीच्या अभ्यासाचा ताण टाळता येतो, तर पॉलिटेक्निकच्या तीन वर्षांत अभियांत्रिकी शिक्षणाचा भक्कम पाया तयार होतो. एखादे वर्ष अधिक जात असले तरी पदविका मिळाल्यानंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेशाचा मार्ग मोकळा होत असल्याने पदवी पूर्ण होते.

काय आहे पात्रता

पॉलिटेक्निक डिप्लोमा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी (बारावीत गणित विषय आवश्यक) तसेच त्याच गुणांच्या अटींसह, अथवा संबंधित शाखेत तीन वर्षांचा डी.व्होक. अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी थेट दुसर्‍या वर्षी अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी पात्र ठरतात. पीसीआय मान्यताप्राप्त संस्थेतून डी.फार्म. अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळतो.

  • प्रथम वर्ष जागांपैकी दुसर्‍या वर्षी यासाठी 10 टक्के जागा राखीव असतात. त्यामुळे पुरेशा जागा उपलब्ध होतात व पहिल्या वर्षी प्रवेश घेऊन सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांची जागाही मिळते. तसेच मागासवर्गीय आरक्षणासह प्रवेशाची दारे खुली असतात. यामुळे इथे बहुतांश विद्यार्थी संधी शोधतात, असे तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांनी सांगितले. पहिल्या वर्षीच्या तुलनेत थेट दुसर्‍या वर्षात प्रवेश घेणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news