

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (यूबीटी)चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये जावून गंगेमध्ये डुबकी मारली यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, गंगेत डुबकी मारल्याने पापे धुतली जात नाहीत. महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचे त्यांचे पाप गंगेत कितीही स्नान केले तरी धुतले जाणार नाही. शिंदे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, "मी गंगेचा आदर करतो, पण त्यात डुबकी मारून काही उपयोग नाही. तुम्ही महाराष्ट्राला फसवता आणि नंतर गंगेत उडी मारता. त्यामुळे कोणाचेही पाप धुतले जात नाही. देशद्रोही असल्याचा कलंक गंगेत अनेक वेळा स्नान करूनही नाहीसा होऊ शकत नाही." मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित एका पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, "भाजपला भगवान रामाचे महत्त्व शिकवण्याची गरज नाही."
यापूर्वी, एकनाथ शिंदे यांनी महाकुंभ मेळाव्यात उपस्थित न राहिल्याबद्दल उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. शिंदे म्हणाले होते की, "ठाकरे स्वतःला हिंदू म्हणवण्यास घाबरतात." याच आठवड्यात, शिंदे आणि शिवसेनेचे आमदार महाकुंभासाठी प्रयागराजला गेले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, "जे महाकुंभाला आले नाहीत, त्यांनी सांगावे की त्यांनी यात का भाग घेतला नाही. ते स्वतःला हिंदू म्हणवतात, पण त्यांनी महाकुंभात सहभागी होण्यास टाळाटाळ केली."
एकनाथ शिंदे म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांनी 'गर्व से कहो हम हिंदू हैं' हा नारा दिला होता. मात्र, आता काही लोकांना स्वतःला हिंदू म्हणवण्यास आणि बाळासाहेबांना हिंदू हृदयसम्राट म्हणण्यास भीती वाटते." शिवसेनेत २०२२ मध्ये झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे. उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिंदे आणि त्यांच्या समर्थक ३९ आमदारांवर भाजपच्या मदतीने पक्षाविरोधात बंड केल्याचा आरोप केला होता.