

मुंबई : राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बाँड बंद करून आता त्याऐवजी ‘ई-बाँड’ प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे कागदी स्टॅम्प पेपरला आजपासून ‘गुड बाय’ मिळाला आहे. ई-बाँड सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील सोळावे राज्य आहे. व्यवहार सुलभ करणार्या प्रक्रियेला गती देणारा हा निर्णय महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
बावनकुळे म्हणाले, सध्या आयात-निर्यात व्यवसायांसाठी दर महिन्याला सुमारे तीन ते चार हजार बाँड काढले जातात. ज्यामुळे वर्षाकाठी चाळीस हजारांहून अधिक बाँड स्वीकारले जातात. या सर्व मोठ्या व्यवहारात आता ई-बाँडमुळे क्रांती होणार आहे. ही प्रक्रिया प्रथमदर्शनी लहान वाटत असली तरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल.
ई-बाँड पद्धती कशी असेल आणि तिचा राज्याच्या अर्थकारणाला कसा लाभ होईल, याचे सादरीकरण नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी मंत्रालयात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात केले. राज्य सरकारने डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रशासनात आधुनिकता आणण्याचा घेतलेला हा निर्णय, महाराष्ट्राला व्यापार सुलभतेच्या निर्देशांकात अधिक वरच्या स्थानी घेऊन जाण्यास निश्चितच मदत करेल.
व्यवहार सुलभता : आयात-निर्यात करणार्या व्यावसायिकांना आता महाराष्ट्रातील सर्व कस्टम कार्यालयांमधून ई-बाँड सहजपणे उपलब्ध होतील. बाँड मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान होणार आहे.
पर्यावरणाचे रक्षण : आजपर्यंत वापरले जाणारे पाचशे रुपयांचे कागदी स्टॅम्प पेपर आता बंद होतील. त्यांच्या जागी डिजिटल बाँड उपयोगात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात कागदांची बचत होईल, ज्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल.
व्यवहारात पारदर्शकता : ई-बाँडमुळे व्यवहारात सुलभता येण्यासोबतच पारदर्शकता वाढेल, तसेच महसुलाची गळती थांबण्यास मदत होऊन सरकारी तिजोरीत भर पडेल.