धारावी : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा श्रीगणेशा अदानी समूहाच्या डीआरपीपीएलने अत्यंत छुप्या पद्धतीने केल्याने तमाम धारावीकरांत संतापाची लाट उसळली आहे. या छुप्या भूमिपूजनामुळे धारावीकर संभ्रमात सापडल्याचे पाहून धारावी बचाव आंदोलनाने पुन्हा एकदा धारावीत जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्यानुषंगाने रविवारी सकाळी धारावी क्रॉस रोडवरील इंदिरा भीमा चाळ, राधाकृष्ण चाळ, पेरियार नगर परिसरात धारावी बचाव आंदोलनाने बैठक लावून अदानी समूह डीआरपीपीएलचा काळ्या कारभाराचा पर्दाफाश केला.
कोणताही विकास आराखडा जाहीर न करता विकासक आणि सत्ताधारी पक्षांनी धारावीकरांना पात्र-अपात्रच्या फेऱ्यात अडकवून धारावीबाहेर हुसकावण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी बचाव आंदोलनातील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी या सरकारी निर्णयाची गंभीर दखल घेतली असून विकासक आणि सत्ताधारी पक्षांचा डाव उलटून टाकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तुमच्या घरांवर नंबर जरी पडले असतील तर घाबरून जाऊ नका. घरांची कागदपत्रे अथवा तुमचा मोबाईल नंबर सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अदानीच्या कर्मचाऱ्यांना देऊ नका, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
धारावीकरांच्या हक्काच्या घरांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढाईत सत्ताधारी पक्षांचे नेते, स्थानिक कार्यकर्ते धारावीत जाहीर सभा घेऊन धारावीकरांची फसवणूक करत आहेत. सर्वेक्षण करण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यास आम्हाला घर कोठे देणार ते विचारा, तसेच जीआरची मागणी त्यांच्याकडे करा. प्रत्येक धारावीकराला धारावीत आपल्या हक्काचे ५०० चौ. फुटांचे घर, दुकानाच्या बदल्यात दुकान मिळालेच पाहिजे, असे माजी आमदार बाबुराव माने म्हणाले. आता आपल्या हक्काच्या घराची लढाई आपल्यालाच लढायची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र या, कोणताही जाती, भेदभाव पाळू नका, असेही ते म्हणाले. अॅड. संदीप कटके, समन्वयक उल्लेश गजाकोश यांनीही आपल्या भाषणातून ही आरपारची लढाई असल्याचे सांगत अदानीच्या डीआरपीपीएलच्या कारभारावर टीकेची झोड उठवत 'अदानी हटाव... धारावी बचाव'चा नारा दिला. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून धारावीकरांची दिशाभूल कोणी करू शकत नाही. धारावीकरांना घरांच्या बदल्यात घर आणि व्यावसायिक गाळे मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असेही ते म्हणाले. समन्वयक उल्लेश गजाकोश यांनी आयोजित केलेल्या बैठकीत माजी आमदार बाबुराव माने, संदीप कटके, पॉल राफेल, यांच्यासह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.