

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
अकरा दिवस भक्तिभावाने सेवा करून (मंगळवार) मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यास सुरुवात केली आहे. गिरगाव चौपाटीसह जुहू व विविध विसर्जन स्थळी लाखो भक्तांची मांदियाळी दिसत आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच मुंबईचा राजा व सार्वजनिक गणपती बाप्पा विसर्जनासाठी रवाना झाले आहेत. लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. मुंबई उपनगरचा राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सामील झाले आहेत. सर्वत्र गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष वातावरणात घुमू लागला आहे.
गणेशोत्सवामुळे संपूर्ण मुंबईत गेल्या ११ दिवसांपासून भक्तिमय वातावरण दिसून आले. आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाची लाखो भक्तांना अक्षरशः आस लागली होती. त्यामुळे दिवस-रात्र एक करत भक्तांनी आपल्या गणरायाचे दर्शन घेतले. उत्सवाचे ११ दिवस कधी निघून गेले, हे समजले सुद्धा नाही. अखेर मंगळवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला जल्लोषाच्या विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी केली आहे.
मुंबईचा राजा आणि तेजू काया मेन्शनचा बाप्पा यांचा विसर्जन मिरवणुकांना प्रचंड मोठी भाविकांची गर्दी दिसत आहे. संपूर्ण मुंबई शहरात गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष ऐकू येत होता. यावेळी गिरगाव चौपाटीसह जुहू व विविध विसर्जन स्थळी लाखो भक्तांचा महासागर लोटला आहे, तर रस्तेही भक्तांनी फुलून गेले आहेत. मिरवणुकीत ढोल ताशांचा अखंड गजर सुरू आहे.
मुंबई शहर व उपनगरात सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण आहे. मुंबईसह आजूबाजूच्या भागातून आलेल्या भक्तांनी लालबागच्या राजासह विसर्जन स्थळी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांसह गिरगाव, जुहू, दादर, गोराई आदी चौपाटी व अन्य विसर्जनस्थळी लाखो भक्तांचा अक्षरशः महासागर लोटला आहे.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. असा जयघोष करत, वाद्यांच्या गजरामध्ये रस्त्यांवरून निघालेल्या मिरवणुका, गणरायावर ठिकठिकाणी रस्त्यावर होणारी पुष्पवृष्टी त्यामुळे संपूर्ण मुंबई शहर भक्तिमय होऊन गेले आहे. ठीकठिकाणी उभारलेल्या नियंत्रण कक्षाद्वारे भक्तांना विविध सूचना करण्यात येत आहेत, तर सगळीकडे पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लालबागच्या राजा सार्वजनिक उत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. लालबागच्या राजाच्या मुख्य द्वारातील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची कसरत पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई बाप्पाच्या मिरवणुकीसाठी रस्त्यावर उतरली आहे.