पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात आज (दि.५) पुन्हा एकदा 'देवेंद्र पर्वा'ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. (Maharashtra CM Oath Ceremony) देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अनंत अंबानी, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, अभिनेता रणबीर कपूर,अभिनेता रणवीर सिंग, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख उपस्थिती होती. (Maharashtra CM Oath Ceremony)
शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. मुंबईतील विमानतळाला पोलिसांचा छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांचे खास गुलाबी फेटे बांधून स्वागत करण्यात येत आहे. आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून आज या शपथविधी सोहळ्याचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याच शपथविधी कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातून नागरिक येत असताना अजित पवारांच्या बारामतीमधूनदेखील मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत. इथे आलेल्या सर्वच मान्यवरांचे गुलाबी फेटा बांधून त्यांचा स्वागत केले जात आहे. अजित पवार यांनी संपूर्ण निवडणुकीत गुलाबी पॅटर्न वापरलेला होता. त्याच अनुषंगाने आता शपथविधी सोहळ्यासाठीदेखील गुलाबी फेटे बांधून अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी आले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
केंद्रीय पक्षनिरीक्षक म्हणून मुंबईत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजप नेते विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (दि.४) भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण 237 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. सर्वप्रथम २०१४ मध्ये त्यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर २०१९ मध्ये त्यांनी शपथ घेतली. मात्र अवघ्या काही तासांमध्ये त्यांना राजीनामा सादर करावा लागला होता.