State Marathi Film Awards : मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद् गार
State Marathi Film Awards
मुंबई : एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे झालेल्या सोहळ्यात अभिनेत्री काजोल, मुक्ता बर्वे, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, गझलकार भीमराव पांचाळे यांना पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी. छाया : दीपक साळवी
Published on
Updated on

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाच्या रुपाने रुजलेले हे बीज आज वटवृक्ष बनले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. संपूर्ण देशात मराठी रंगभूमीसारखे दुसरे उत्तम क्षेत्र नाही. आपल्या अभिजात कार्याने येथील सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांनी मराठी माणसाचा जीवनानुभव समृद्ध केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कलेच्या या सेवेबद्दल सर्वांचे अभिनंदनही केले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 व चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 तसेच 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार, कलारसिक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुपम खेर यांच्या अभिनयाचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्याच चित्रपटात 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणारे खेर आजही तितक्याच उत्साहाने अभिनय करत आहेत. मुक्ता बर्वे यांच्या 360 अंश अभिनय क्षमतेचा, विशेषतः ‘चार चौघी’मधील त्यांच्या मोनोलॉगचा, तसेच महेश मांजरेकर यांच्या दमदार अभिनय आणि दिग्दर्शनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. गझलकार भीमराव पांचाळे यांचा उल्लेख करताना सुरेश भट आणि भीमराव पांचाळे यांची जोडी मराठी गझलांना अविस्मरणीय उंचीवर घेऊन गेली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. मराठी चित्रपटसृष्टी आमचं वैभव आहे आणि ती भविष्यात अधिक समृद्ध होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

यांना करण्यात आले सन्मानित :

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गजलगायक भीमराव पांचाळे यांना 2025 सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री काजोल देवगण यांना 2024 सालचा स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार, पद्मभूषण अनुपम खेर यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024, अनिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025“ हा युनेस्कोतील भारताचे कायस्वरूपी प्रतिनिधी राजदूत विशाल शर्मा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणार्‍या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, दुर्ग अभ्यासक माधव फडके यांना सन्मानित करण्यात आले.

मुंबईत कुठेही चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी : मंत्री आशिष शेलार

मुंबईतील कोणत्याही लोकेशनवर चित्रीकरणासाठी परवानगी आता नि:शुल्क दिली जाणार आहे. तसेच राज्यातील विविध चित्रपट निर्मिती स्थळांवर सुलभ दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

खालिद का शिवाजीवर बंदी घालण्याची मागणी : सोहळ्यात झळकवले बॅनर

खालिद का शिवाजी या चित्रपटावर विविध घटकांकडून आक्षेप घेतला जात आहे. त्याचे पडसाद चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात पाहायला मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच काही लोकांना खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने खोटा इतिहास पसरविणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दोघांनी बॅनरही झळकाविले. अखेर, मुख्यमंत्र्यांनी आपण आपले म्हणणे मांडल्याचे सांगत त्यांना शांत केले आणि आपल्या भाषणाला सुरूवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news