

मुंबई : कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याने गुंतवणूकदारांचा ओढा महाराष्ट्राकडे अधिक आहे. आजच परकीय गुंतवणुकीचे तिसऱ्या तिमाहीतील आकडे समोर आले असून यावेळीही महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार, उद्योजकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणांत थेट मकोका लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राज्यात आघाडीचे सरकार असल्याने आघाडी धर्माचे जरूर पालन करू, मात्र पारदर्शक आणि स्वच्छ प्रशासनाबाबत कोणतीच तडजोड स्वीकारली जाणार नाही. मित्र पक्षांच्या नेत्यांकडून चूक झाली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्री फडणवीस गांनी दिला.
मुंबईत एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासह कायदा-सुव्यवस्था, धनंजय मुंडे यांचा राजीनामा, राज्यातील गुंतवणूक, लाडकी बहीण योजना अशा विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, बीडच्या घटनेनंतर मी सीआयडी चौकशी लावली. तपासात माझ्यासकट कुणाचाही हस्तक्षेप नसेल असे बजावत सीआयडीला पूर्ण क्षमतेने तपासाचे आदेश दिले. त्यांनी चांगला तपास केला, आमच्या न्यायवैडाक विभागानेही उत्कृष्ट काम केले. सध्या जे फोटो व्हायरल झाले ते असेच मिळालेले नाहीत. तर, तपास यंत्रणांनी शोधून, खष्णून काढले आहेत. हरवलेले मोबाईल शोधले, संपूर्ण डेटा मिळविला. त्यामुळे फोटोही समोर आले आणि चार्जशीटमध्ये त्याचा समावेश झाला आहे. मी सुद्धा व्हायरल झाल्यावरच ते फोटो पाहिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की नाही, या वादात मला पडायचे नाही. मात्र, ज्या पद्धतीने हत्या झाली, त्यातील मास्टरमाइंड म्हटली गे लेली व्यक्ती मंत्र्यांच्या इतकी जवळची असल्याने नैतिकतेच्या आचारावर राजीनामा दिला पाहिजे. आघाडीचे सरकार असल्याने निर्णय घ्यायला थोडा विलंब झाला. मात्र, हे संपूर्ण प्रकरण आम्ही ठामपणे हाताळले आणि मुंडे यांनी राजीनामा दिला, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खंडणीच्या प्रकरणात धनंजय मुंडेच्या इथे बैठक झाली, मुंडेंनी कारवाईत हस्तक्षेप केला, असा एक जरी पुरावा किंवा धागा सीआयडीला मिळाला असता तर त्यांच्यावरही कारवाई केली असती, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार लाडकी बहीण योजनेमुळे ४५ हजार कोटींचा बोजा पडणार असला तरी अशा योजनांचा सामाजिक आशय लक्षात घ्यायला हवा. ही योजना महिलांचे सक्षमीकरण करणारी आहे. जेव्हा योजना जाहीर करून अंमलबजावणी केली तेव्हा २ कोटी ८० लाख बहिणींना त्याचा लाभमिळाला. सध्या निकषाबाहेरील महिलांची नावे वगळली जात असली तरी तो आकडा छोटाच असणार आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतेच कोल्डवॉर नाही. मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय झाला तो त्यांच्या सहमतीनेच झाला आहे. इथे कोणती जबरदस्ती वगैरेचा प्रश्नच नाही. काही बाबतीत मते वेगळी असली तरी महायुतीत आम्ही समन्वयाने निर्णय करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले, आताच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार चालविताना पहिल्या वेळी जो ताण जाणवायचा तो आता जाणवत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
क्रूर मुघल शासक औरंगजेब कोणाचाही नायक होऊ शकत नाही. अबू आझमी यांचे विधान असंवेदनशील असले तरी ते मुद्दाम केले गेलेले आहे. अशा विधानातून धार्मिक ध्रुवीकरणाचा, व्होट बँकेला चालना देण्याचा हेतू असतो. आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. मात्र, उत्तर प्रदेशात निवडणुका होणार असल्याने समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव याचे राजकारण करत आहेत. आपण छत्रपती शिवाजी महार-ाजांचा वारसा सांगतो की औरंगजेबाचा याचे उत्तर अखिलेश यांनी द्यावे असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रशांत कोरटकरसारख्या लोकांच्या वक्तव्यांचे समर्थन करता येणार नाही. त्याच्याशी आमचा कसला आलाय संबंध? तो एक पत्रकार आहे. सर्वांना भेटत त्यांच्यासोबत फोटो काढत फिरत असतो. त्याने न्यायालयाकडून काही आदेश मिळवले असले तरी त्याला सोडू, अशातला भाग नाही. कोरटकरलाही शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.