CM Devendra Fadnavis | अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री

विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री फडणवीस भावुक; सारे विधिमंडळ गहिवरले; अश्रूंचा बांध फुटला!
Ajit Pawar
उपमुख्‍यमंत्री अजित पवारFile photo
Published on
Updated on

मुंबई : वक्तशीरपणा हा अंगभूत गुण असलेले अजित पवार कधीच वेळ चुकवत नसत. राजकारणात ते मोठी ‘इनिंग’ खेळतील, असे दिसत असताना त्यांनी पहिल्यांदाच आयुष्याचे टायमिंग चुकवले. सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. मी कधीतरी मुख्यमंत्री होईन; पण उपमुख्यमंत्री म्हणून मी कायम राहीन, असे अजित पवार अनेकदा म्हणायचे. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यांनी भरवशाचा नेता आणि दिलदार मित्र गमावला, अशा शब्दांत अजित पवार यांना आदरांजली अर्पण केली.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. अजित पवारांसह माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक, माजी मंत्री शालिनी पाटील, माजी राज्यमंत्री राज पुरोहित, आमदार गंगाधर पटने, नीळकंठ फालक, विश्वास नांदेकर, रूपलेखा ढोरे यांच्या निधनाबद्दलही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेकदा ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर आपण ‘पोकळी निर्माण झाली’ असे म्हणतो. मात्र, अजित पवारांच्या जाण्याने या शब्दाची खरी व्याख्या कळली. अजित पवारांसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व होणे आता शक्य नाही. ते केवळ आमचे ‘स्ट्रॅटेजिक पार्टनर’ नव्हते, तर अंतःकरणापासून मित्रत्व जपणारे माझे मोठे भाऊ होते. आमचा दोघांचाही जन्म 22 जुलैचा, ते माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठे असल्याने खर्‍या अर्थाने माझे ‘दादा’च होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस यांनी 2019 च्या बहुचर्चित शपथविधीची आठवणही यावेळी सांगितली. 2019 मध्ये सरकार स्थापनेचा निर्णय त्यांच्या वरिष्ठांनी बदलला. तथापि, अजित पवारांनी मला शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला. त्याला लोक पहाटेचा शपथविधी म्हणत असले तरी ते त्यांना आवडत नसे. कारण तो सकाळी आठ वाजता झाला होता. त्यांनी शब्दासाठी मोठी राजकीय किंमत मोजली. पुढे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यावरही आम्ही ‘वर्षा’वर सोबत होतो. तेव्हा मीच त्यांना सांगितले की, तुमच्यासोबतच्या सहकार्‍यांचे भविष्य पाहता. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहात, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.

त्यांच्या नसण्याने खूप प्रश्न निर्माण झाले आहेत

अजित पवार हे एका पिढीचा आत्मविश्वास होते. मातीतून स्वकष्टाने उभे राहिलेले त्यांचे नेतृत्व होते. अनेक संघर्षांना ते सामोरे गेले, कधी कुणासमोर झुकले नाहीत. ज्यावेळी त्यांना वाटले चूक आहे तेव्हा जाहीर माफी मागायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. अनेकांचा आधारवड असलेले, अनेकांना धीर देणारे, अनेकांची ताकद असलेले अजित पवार नसल्याने खूप प्रश्न निर्माण झाले आहेत.

अजितदादांसारखा अर्थमंत्री हवा

कोणत्याही मुख्यमंत्र्याला अजित पवारांसारखाच अर्थमंत्री हवा. यावर्षी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 12 वा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून त्यांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असती. कदाचित त्यानंतरच्या कालावधीत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले असते. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना अजित पवारांसारखाच अर्थमंत्री हवा असतो. जो वास्तविकतेचा आरसा दाखवेल, पण राज्याचा विकास थांबवणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणाचा मिलाफ

एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. घड्याळ आणि दादांचे अतूट नाते होते. घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांचा कारभारही शिस्तीचा होता. दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणाचे प्रतीक होते. गेली अनेक वर्षे त्यांनी राज्याचे अर्थखाते सांभाळले होते. अर्थसंकल्पही तेच मांडत होते. आता त्याच अधिवेशनात दादांनाच श्रद्धांजली वाहण्याची वेळ येते, हे अत्यंत वेदनादायी आहे. अजितदादांच्या निधनाने राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या जाण्याने एक भरवशाचा नेता आणि दिलदार मित्र गमावला गेला, अशा शब्दांत शिंदे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

विश्वासू सहकारी गमावला : उद्धव ठाकरे

आपल्या सर्वांनाच आपले वाटणारे अजितदादा या सभागृहात किंवा या विधिमंडळात दिसत नाहीत, याची खंत आज आपल्या सर्वांच्या मनात आहे. माणसे येतात, माणसे जातात. माणसे असताना त्यांचे महत्त्व कधी कळत नाही. परंतु, ती नसतात त्यावेळी त्यांचे महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो. दादांच्या रूपाने उत्तम, विश्वासू, दिलदार आणि विश्वासार्ह सहकारी मित्र गमावला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आधारवड उन्मळून पडला : छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांना तर ‘श्रद्धांजली’ हा शब्द उच्चारणेही कठीण झाले होते. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. ते मंत्रालयात कुठेतरी काम करत असतील, असेच अजूनही वाटते. दादा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या गुणांचा मिलाफ होते, असे भुजबळ म्हणाले तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला होता.

सुनील तटकरे, सयाजी शिंदे उपस्थित

अजित पवार यांचा शोकप्रस्ताव मांडला जात असताना सभागृहाच्या गॅलरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अभिनेते सयाजी शिंदे आवर्जून उपस्थित होते.

त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही : रोहित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताला जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विमान अपघाताचा मुद्दा भविष्यातही आग्रहाने मांडणार असल्याचा इशारा विधानसभेत शोकप्रस्तावावर बोलताना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news