

मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून, महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र येत शेती करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वर्षा निवासस्थानी ‘पाणी फाऊंडेशन’च्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’च्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. झूम लिंकद्वारे राज्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी स्मार्ट शेती ॲपचे लोकार्पण करण्यात आले. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी २६ ऑगस्ट २०२५ पासून राज्यभरात ४६ तालुक्यांत सुरू असलेल्या फार्मर कपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वासच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल. फार्मर कपमधील १८ हजार शेतकरी गट हे महाराष्ट्रातील शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत. त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील. विधानमंडळात महिला शेतकरी विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. शेतीच्या मालकीमध्ये नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता दिली जाणार आहे. मागील वर्षी फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या गटांमध्ये सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांच्या उत्पादनात सरासरी ७१ टक्क्यांनी वाढ झाली. सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर १,५८४ कोटी रुपयांची बचत झाली, तर सामूहिक श्रमांमुळे एकरी सुमारे ६ हजार रुपयांची मजुरीची बचत झाली. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र हे एआयचा शेतीमध्ये वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. ‘महाविस्तार ॲप’ व ‘फार्मर कप’मधील माहिती एकत्रित करून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन केले जाईल. फार्मर कपमधील अनुभवाद्वारे राज्याच्या कृषी धोरणांत बदल केले जातील. राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रित नियोजन (कन्व्हर्जन्स) केल्यास गटशेती अधिक सक्षम होईल.
अभिनेते आमीर खान म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर सर्वप्रथम शेतकरी उन्नत आणि सक्षम होणे आवश्यक आहे. राज्यभरात फार्मर कपच्या माध्यमातून १८ हजारांहून अधिक शेतकरी गटांची निर्मिती झाली आहे. या संपूर्ण उपक्रमात मेंटर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जसा एक उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो, त्याचप्रमाणे मार्गदर्शक शेतकरी गटांना योग्य दिशा देऊन त्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावतील. हा उपक्रम डिजिटल आणि प्रत्यक्ष संपर्क यांचा प्रभावी संगम आहे.