

मुंबई : जादूटोणा करून समस्या सुटल्या असत्या, तर आपण ड्रोनऐवजी लिंबू-मिरचीने युद्ध लढलो असतो आणि सीमेवर सैनिक पाठवण्याऐवजी पाच-दहा भोंदूबाबांना पाठवून सीमा सुरक्षित केल्या असत्या. एवढेच नव्हे तर दहशतवाद्यांना घरबसल्या टाचण्या टोचून संपवले असते, अशा बोचर्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदूगिरी आणि बुवाबाजीच्या नादी लागणार्या नेत्यांचे कान टोचले.
विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावर भाष्य करून संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा दिला. या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद जावे म्हणून काहींनी खरातकडून तंत्रमंत्र करून घेतल्याचा आरोप केला. या आरोपांची खिल्ली उडविताना मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली.
संतांकडूनही अंधश्रद्धेवर प्रहार
सकारात्मकता, प्रामाणिकता आणि ज्यात कुणाचे अहित होत नाही ती खरी श्रद्धा. ज्यात दुसर्याचे अहित होते ती कधीच श्रद्धा असू शकत नाही, असे सांगत महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा असून, या संतांनीही अंधश्रद्धेवर प्रहार केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. खरातविरोधात सरकार कडक कारवाई करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विकृत खरातप्रकरणी ज्यांच्याकडे माहिती असेल ती त्यांनी शासनाकडे द्यावी, असे आवाहनही केले.
महाराष्ट्र धर्म वाढवा
आपला महाराष्ट्र धर्म वाढवा, तो वाढला पाहिजे. मात्र, यात भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये. त्यादृष्टीने आपल्याला काम केले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.