मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) तब्बल तीन लाख महिला लाभार्थ्यांना व्यक्तिशः पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे. भाजप तुमच्यासाठी आणि आपण सगळे महाराष्ट्रासाठी' या मोहिमेला अंतर्गत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही पत्रे पाठविली आहेत. लाडकी बहीण योजनेसह लखपती दीदी, एसटी महामंडळाच्या बसप्रवासातील सवलतीचा फडणवीसांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. तसेच, विकासाच्या या प्रवाहात एकही बहीण वंचित राहू नये, यासाठी तुझ्यासारख्या इतरही बहिणींना सोबत जोडून घेण्यासाठी हा देवाभाऊ तुला साद घालतो आहे. महाराष्ट्राला तुझी गरज असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) दोन कोटींहून अधिक लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिल्या दोन महिन्यांचे तीन हजार रूपये जमा झाले आहेत. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाने या योजनेच्या निमित्ताने विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'देवाभाऊ' या नावाने आपल्या बहिणींना साद घातली आहे. महिला वर्गाच्या पुढाकारामुळेच ही योजना कमी कालावधीत परिणामकारकपणे राबविण्यात यश आल्याचे या पत्रात फडणवीसांनी नमूद केले आहे.
लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana), लखपती दीदी, एसटी प्रवासातील सवलती, मोफत उच्चशिक्षण अशा महिला केंद्री योजनांचा उल्लेख करत महिला सक्षमीकरणासाठी भाजप कटीबद्ध असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सोबतच, या विविध योजनांमध्ये अधिकाधिक पात्र लाभार्थी बहिणींना सोबत जोडून घेण्यासाठी हा देवाभाऊ तुला साद घालतो आहे. महाराष्ट्राला तुझी गरज आहे. तू, मी आणि आपला पक्ष, आपण सगळे छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र साकारण्यासाठी असेच मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही या पत्रातून करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात फडणवीसांचे हे पत्र रवाना करण्यात आले होते. या पुढचा टप्पा म्हणून भाजप महिला आघाडीने लाभार्थी महिलांशी घरोघरी जाऊन संपर्क, संवादाची मोहीम आखली आहे.