

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघात आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून होणार्या विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात निरर्थक आणि चुकीचे वादविवाद सुरू आहे. खालच्या पातळीचे राजकारण आता बंद करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी घटक पक्षातील नेत्यांसह विरोधकांनाही चांगलेच खडसावले.
अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या आकस्मिक मृत्यूबाबत काही घटकांकडून विविध तर्कवितर्क मांडले जात आहेत. त्यात आता राजकीय विधानेही होत आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आता शिवसेना शिंदे गटाकडूनही विधाने केली जात आहेत. यावर नागपुरात माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. विमान अपघातामुळे जनतेत लोकप्रिय असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा दु:खद प्रसंगी संयम राखणे, संवेदनशीलता दाखवणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे गटाच्या नेत्यांच्या विधानांवर मुख्यमंत्री नाराज
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम, मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर केलेल्या वक्तव्य आणि टीकाटिपण्णीनंतर सुरू झालेल्या वादंगावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.