

Deputy CM Eknath Shinde Statment
ठाणे: पाहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले असून, "पाकिस्तानविरोधात आतापर्यंतची सर्वात कडक कारवाई मोदींनी केली आहे," असे म्हटले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातून पाच जणांना हाकलण्यात आले, सिंधू नदी करार रद्द करण्यात आला, अटारी सीमेवरून वाहतूक बंद करण्यात आली आणि भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आले. हे निर्णय ऐतिहासिक असून, तीनही संरक्षण दलांना देशाच्या सुरक्षेसाठी मोकळे हात देण्यात आले आहेत."
"पुलवामा हल्ल्यानंतरही सर्जिकल स्ट्राइक करून भारताने ठोस उत्तर दिले होते. यंदाही पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर मिळणार आहे," असे ते म्हणाले. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, "मतांच्या राजकारणामुळे काँग्रेस कधीच कठोर निर्णय घेऊ शकली नाही. त्यामुळे लाखो जवानांना जीव गमवावा लागला." शिंदे यांच्या या विधानामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारची भूमिका अधिक ठाम आणि आक्रमक असल्याचे स्पष्ट होत आहे.