

मुंबई : बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात बकर्यांची आवक 15 मे नंतर वाढणार आहे. त्यामुळे बकर्यांची चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता क्यूआर कोड प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. त्यामुळे पशुवधगृहात आलेले बकरे व विक्री झालेल्या बकर्यांची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.
बकरी ईद 7 जूनला असल्यामुळे 15 मे पासून देवनार पशुवधगृहात बकरे, म्हैसवर्गीय प्राण्यांची आवक सुरू होणार आहे. दरवर्षी सुमारे 2 लाखापेक्षा जास्त बकरे व 10 हजार मोठी जनावर देवनार पशुवधगृहात विक्रीसाठी येतात. पशुवधगृहात दाखल होणार्या सर्व जनावरांची महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकार्यांमार्फत वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतरच विक्रीसाठी ही जनावरे उपलब्ध करून दिली जातात. बकर्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे त्याच्या चोरीचे प्रमाणे गेल्या काही वर्षात वाढले आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी बकर्यांच्या चोरीला आळा घालण्यासाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली तयार करण्यात आली आहे.
क्यूआर कोड प्रणालीमुळे देवनारमध्ये येणार्या बकर्याची नोंद करण्यात येणार आहे. या नोंदीनुसार त्या बकर्याची विक्री केली जाणार आहे. क्यूआर कोडद्वारे नोंदी झालेल्या बकर्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात येणार आहे. तसेच कत्तलखान्यातून बकरे बाहेर नेताना त्यांची प्रवेशद्वारावर क्यूआर कोडनुसार तपासणी होणार आहे.
देवनारमध्ये जमा होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये कचरा उचलण्यात येणार आहे. परिसरातील मृत जनावरे एकाच ठिकाणी गोळा करुन त्वरित उचलण्यासाठी कोरा केंद्रामार्फत दोन पाळयांत व्यवस्था करण्यात येणार आहे. बकरी ईदच्या कालावधीत निर्माण होणार्या कचर्याची तात्काळ विल्हेवाट लावण्यात येणार आहे. मृत जनावरांकरिता वेगळी शेड बांधण्यात येणार आहे.