

मुंबई : मुंबईसह जळगाव पोलीस दलातील चार अधिकार्यांना मंगळवारी गृहविभागाने सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती दिली आहे. त्यात चकमकफेम अधिकारी दया नायक यांचा समावेश असून निवृत्तीच्या तीन दिवसांपूर्वी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे.
गृहविभागाच्या कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी मंगळवारी बढतीचे आदेश जारी केले होते. गेल्या काही दिवसांपासून काही पोलीस निरीक्षकांसह मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत होते.
अखेर मंगळवारी त्यापैकी चार पोलीस अधिकार्यांच्या बढतीचे आदेश जारी करण्यात आले. त्यात मुंबईतील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह जळगावच्या एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.
दयानंद बडा नायक, जीवन श्रीरंग खरात, दीपक कृष्णा दळवी आणि पांडुरंग विठ्ठल पवार अशी या चार पोलीस अधिकार्यांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाल्यानंतर मुंबईतील दयानंद नायक, जीवन खरात आणि दीपक दळवी यांची मुंबई शहरात बदली दाखविण्यात आली, तर जळगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
31 वर्षांच्या सेवेनंतर दयानंद नायक हे 31 जुलैला मुंबई पोलीस दलातून निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या तीन दिवसांपूर्वी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाल्याने आनंद व्यक्त केला.