Dawood Aide Drug Party |दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज पार्टीत कलाकारांसह राजकारण्यांची हजेरी
मुंबई : कुख्यात अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर कसून तपास सुरू झाला आहे. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांनी दाऊदचा हस्तक व अमली पदार्थांचा तस्कर सलीम डोळा याचा मुलगा ताहीर डोळा याने भारतात आणि भारताबाहेर आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्ट्यांना हजेरी लावल्याचे पुढे आले आहे.
मुंबई पोलिसांच्या अॅन्टी नार्कोटिक्स सेलने दाऊदचा हस्तक असलेला सलीम डोळा चालवत असलेले ड्रग्ज सिंडिकेट उघडकीस आणले. हे सिंडिकेट्स सलीम दुबईतून चालवतो. मेफेड्रोन अर्थात एम कॅट, मॅव मॅव आणि आईस यांसारखे अमली पदार्थ या सिंडिकेटमधूनच भारताच्या सात-आठ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवले जातात. याच सिंडिकेटमध्ये काम करणारा सलीम डोळाचा मुलगा ताहीर डोळा याला गेल्या ऑगस्टमध्ये अटक करून संयुक्त अरब अमिरातीने भारताच्या हवाली केले. त्याच्या चौकशीची गोपनीय कागदपत्रे माध्यमांपर्यंत पोहोचली. त्यातून तस्कर डोळाने आयोजित केलेल्या ड्रग्स पार्ट्या व तेथे बॉलीवूडच्या नट-नट्यांपासून राजकीय नेत्यांनीही लावलेल्या हजेरीचा पर्दाफाश झाला आहे.
ताहीर डोळाची कोठडी मागताना पोलिसांनी या पार्ट्यांचा उल्लेख केला. देशात आणि देशाबाहेर तो ड्रग्ज पार्ट्या आयोजित करायचा व अशा पार्ट्यांना ड्रग्ज पुरवायचा त्याची अधिक चौकशी करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी म्हटले. ताहीर डोळाने दाऊदच्या टोळीकडून चालवल्या जाणार्या ड्रग्ज सिंडिकेटची धक्कादायक माहिती दिल्याने या प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेसह ईडीनेदेखील सुरू केला आहे. ताहीर डोळाच्या पार्ट्यांना हजेरी लावणार्या नट-नट्या, रॅपर्स आणि चित्रपट निर्मात्यांना गुन्हे शाखेचे समन्स बजावले जाऊ शकते आणि प्रसंगी त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते.
16 फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबई पोलिसांनी सांगलीतील मेफेड्रोनचा कारखाना उद्ध्वस्त करून 252 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या 12 जणांच्या जबानीतून सलीम डोळा त्याचा मुलगा ताहीर, मोहम्मद सोहेल शेख उर्फ लॅविश यांची नावे पुढे आली होती. हे सर्वजण दुबईत असल्याचे उघड झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यात ताहीर आणि सलिम डोळाचा पुतण्या मुस्तफा कुबावाला यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले होते.
ताहीर डोळाकडून देशात आणि देशाबाहेर अनेक ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या गेल्या. दाऊदच्या नातेवाइकांसह बॉलीवूडचे चित्रपट कलाकार, मॉडेल, चित्रपट निर्माते, रॅपर्सनेही या पार्ट्यांना हजेरी लावली. अलिशा पारकर, नोरा फतेही, श्रद्धा कपूर तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झिशान सिद्दिकी, निर्माता अब्बास-मस्तान यांचा समावेश असल्याचे ताहीरने मुंबई पोलिसांचे सांगितले. या सर्वांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागू शकतो. मुंबई पोलिसांनी दुबईमध्ये ताहीर डोळाला ताब्यात घेण्याआधीच त्याचा बाप सलिम डोळा तुर्कीयेला पळून गेला. तुर्कीयेशी भारताचा प्रत्यार्पण करार नसल्याने सलिम डोळा त्या देशात सुरक्षितपणे राहू शकतो.

