

मुंबई : दहिसर पूर्वेकडील शांतीनगर परिसरात असलेल्या न्यू जनकल्याण इमारतीत रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गुदमरून एका 80 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल नेण्यात करण्यात आले आहे.
24 मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर रविवारी आग लागली. धूरामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता, तरीदेखील अग्निशमन जवानांनी जीवांची बाजी लावत इमारतीत अडकलेल्या 5 ते 6 नागरिकांची सुखरूप सुटका केली. शॉर्टसर्किट किंवा गॅसगळतीचा संशय असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
श्वसनाचा त्रास झाल्याने रहिवासी अडकले
रविवार असल्याने इमारतीतील बहुतांश लोक घरी होते. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. धूर पसरल्याने श्वसनास त्रास होऊन काही रहिवासी अडकून पडले. त्यांना तत्काळ बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलिसांनी एडीआर नोंदवला असून आगीचे नेमके कारण आणि जबाबदार कोण याचा तपास सुरू आहे.