

दादर : दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील शौचालयाच्या सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शौचालय वापर करण्यासाठी येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शौचालयाची फारशी स्वच्छता होत नसल्यामुळे आत माती आणि घाण पसरली आहे. यामुळे शौचालयाचा वापर करणे प्रवाशांना नकोसे वाटत आहे.
शौचालयातील मुतारी गच्च लघुशंकेने भरल्यामुळे आणि पाण्याची सुविधाही नसल्यामुळे या शौचालयात लघुशंका करण्यासाठी प्रवाशांची रांगच रांग लागलेली असते. अशाच परिस्थितीमध्ये प्रवासी नागरिकांवर लघुशंका करण्याची नामुष्की ओढावत आहे.सध्या दादर या ठिकाणी भारतातून आणि महाराष्ट्रातून असंख्य भीमसैनिक आले आहेत. त्यामुळे शौचालयाचा वापर करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली होती. परिणामी, प्रवासी आणि बाहेरून आलेल्या नागरिकांना दुसरे शौचालय शोधण्याची गरज भासत होती. शौचालयासारख्या मुलभूत सुविधेकडे व्यवस्थीत लक्ष देता येत नसल्याने प्रवासी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाने शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये तसेच पुरेशा पाण्याची सोय करावी,अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.